वास्तव… (भाग १)
मिरी गटात आ.मोनिकाताई राजळे यांचे वर्चस्व कमी तर आ.कर्डीलेंची पकड घट्ट?

संपादकीय – वास्तव (भाग-१)
येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांनी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. पाथर्डी तालुक्यातील एकूण सात जिल्हा परिषद गटांपैकी मिरी जिल्हा परिषद गट हा राजकीय दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण व संवेदनशील मानला जातो. कारण हा गट पूर्वीच्या पाथर्डी विधानसभा मतदारसंघांत समाविष्ट होता परंतु मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर तो राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.
त्यामुळे पाथर्डी तालुक्याच्या पंचायत समिती,बाजार समिती,साखर कारखाना व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने या भागाचा आ.मोनिका राजळे यांच्याशी सबंध येतो.तर विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने आ.कर्डिले यांचे देखील या भागावर विशेष लक्ष असते.
परंतु असे असले तरी यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकालाचा अभ्यास केल्यास हा गट शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. शिवसेनेचे स्व.मोहनराव पालवे यांनी अनेक वर्षे या गटाचे प्रतिनिधित्व केले. परंतु २०१४ साली झालेल्या निवडणुकीत मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत मोहनराव पालवे यांचा पराभव केला होता.परंतु पुढे पुन्हा एकदा स्व.अनिल कराळे यांच्या रूपाने हा गट शिवसेनेच्याच ताब्यात आला. त्यामुळं विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे आमदार झाल्यानंतर त्यांची मिरी-करंजी जिल्हा परिषद गटावरील पकड सैल झालेली दिसून आलेली आहे.तर याउलट आ.कर्डिले यांनी या भागात आपले वर्चस्व निर्माण करून हक्काचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तयार केल्याचे चित्र आहे.कर्डिले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोठी ताकद देऊन या भागावर आपली पकड मजबूत केल्याचे स्पष्ट होत आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील आ.कर्डिले यांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने प्रचार करून आ.कर्डिले यांना या परिसरातून मोठे मताधिक्य मिळवून दिल्याचे निकालातून देखील अधोरेखित झालेले आहे.
दिवंगत माजी आमदार राजीव राजळे यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मिरी व परिसरातील अनेक युवा कार्यकर्त्यांना राजकारणाचे धडे देऊन आपलेसे केले होते.त्यामुळं राजीव राजळे यांच्याशी या भागातील अनेकांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.त्याचाच परिपाक म्हणून स्व.राजीव राजळे हे स्वतः सुरवातीला काँग्रेस नंतर अपक्ष व शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणुकीत उतरलेले असताना देखील मिरी व करंजी परिसरातील कार्यकर्त्यांनी पक्ष न पाहता स्व.राजीव राजळे यांना विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत मोठी राजकीय ताकद दिल्याचा इतिहास आहे. परंतु स्व.राजीव राजळे यांना निवडणुकीत यश न आल्याने त्यांनी सरतेशेवटी पत्नी मोनिका राजळे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांच्या हक्काच्या व विश्वासाच्या मिरी-करंजी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरवले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी देखील राजळे यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मोनिकाताई राजळे यांना निवडून आणले.पुढे मोनिकाताई राजळे यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष होण्याची देखील संधी मिळाली होती.
परंतु त्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजळे कुटुंबीयांनी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन भाजपामध्ये प्रवेश करून भाजपची अधिकृत उमेदवारी मिळवली.

मोनिकाताई आमदार झाल्यानंतर काही कालावधी नंतर राजीव राजळे यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळं आ.मोनिका राजळे यांचे मिरी-करंजी गटाकडे काहीसे दुर्लक्ष होताना दिसून आले.त्यामुळे राजळे यांचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या पासून काहीसे दुरावल्याची वस्तुस्थिती आहे.कारण याचे पडसाद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मागील दोन निवडणुकांवर पडल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.मोनिका राजळे या २०१४ साली आमदार पदी विराजमान झाल्यानंतर मिरी-करंजी गटासाठी २०१५ साली पोटनिवडणूक घ्यावी लागली होती. या पोटनिवडणुकीमध्ये आ.कर्डिले यांनी भाजपकडून वैभव खलाटे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. त्यामुळे उमेदवारी देताना विचारत न घेतल्याने नाराज झालेले राजळे प्रचारातून काहीसे अलिप्त राहिले परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र शिवसेनेच्या दिवंगत मोहनराव पालवे यांच्या पत्नीला साथ दिल्याची चर्चा सर्वश्रुत होती.त्यावेळी मात्र मोहनराव पालवे यांच्या पत्नीला शिवसेनेच्याच बंडखोर उमेदवार व तत्कालीन शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिवंगत अनिलराव कराळे यांच्या पत्नी अनुराधा उर्फ उषाताई कराळे यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.त्यामुळं त्या निवडणुकीत पालवे यांच्या रूपाने आ.राजळेंचाच पराभव झाल्याचे बोलले गेले.
त्यानंतर २०१७ साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी देशभर भाजपची लाट असल्याने तसेच पाथर्डी-शेवगाव च्या मोनिका राजळे व राहुरीचे शिवाजीराव कर्डिले हे दोन्ही आमदार देखील भाजपचेच असल्याने भाजपकडे उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षांतील देखील अनेकांनी प्रयत्न केले. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना आ.कर्डिले व आ.राजळे यांना मोठी कसरत करावी लागली होती.परंतु पक्ष जरी एक असला तरी देखील आ.कर्डिले व आ.राजळे या दोन्ही आमदारांचे एकनिष्ठ व हक्काचे कार्यकर्ते वेगवेगळे आहेत.त्यामुळे दोन्ही आमदारांच्या समझोता एक्सप्रेस मध्ये झालेल्या फॉर्मुल्यानुसार जिल्हा परिषदेची उमेदवारी आ.राजळे यांच्या समर्थकाला तर मिरी व करंजी या दोन्ही गणाची उमेदवारी आ.कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांना देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे आ.राजळे यांनी त्यांचे जवळचे स्नेही व निष्ठावंत समजले जाणारे जवखडचे चारुदत्त वाघ यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती.तर कर्डिले यांनी मिरी मधून संतोष शिंदे व करंजी मधून गंगुबाई आटकर यांना उमेदवारी दिली होती.









