जवखेडे खालसा येथील विद्युत उपकेंद्राचे काम तातडीने सुरु करण्याची आ.राजळेंची मंत्र्यांकडे मागणी
जवखेडे खालसा (ता.पाथर्डी) येथे ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र मंजुर असुन देखील अद्याप प्रत्त्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सदर काम तातडीने सुरु करावे अशी मागणी शेवगाव-पाथर्डी च्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी ऊर्जा राज्यमंत्री ना.मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे केली आहे.

विधानभवन, मुंबई येथे आ.राजळे यांनी जवखेडे खालसाचे सरपंच चारुदत्त वाघ, ग्रामपंचायत सदस्य ॲड.वैभव आंधळे, लक्ष्मण कासार यांच्या समवेत ऊर्जा राज्यमंत्री ना.बोर्डीकर यांची भेट घेतली व जवखेडे खालसा येथील मंजुर उपकेंद्राचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी केली.
यावेळी मंत्री बोर्डीकर यांना अधिक माहिती देताना आ.राजळे यांनी सांगितले की,मांडवे, सोमठाणे,तिसगावचा काही भाग, पारेवाडी,कासारवाडी,जवखेडे दुमाला,जवखेडे खालसा,कामत शिंगवे,हनुमान टाकळी,कोपरे या गावांना तिसगाव उपकेंद्र वरील दोन फिडर वरून विज पुरवठा होतो यापैकी जवखेडे खालसा व दुमाला,कामत शिंगवे,हनुमान टाकळी व कोपरे या गावामधुन मुळा उजवा कालवा जातो त्यामुळे या भागामध्ये बागायत क्षेत्र फार असुन परिणामी विजेची मागणी जास्त आहे , मुळा कालव्याला सध्या आवर्तन चालु आहे, परंतु या भागाला विज पुरवठ्यामध्ये फार अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना कालव्याच्या आवर्तनाचा पुरेसा उपयोग होत नाही. तसेच इ.१० वी व १२ वीचे परीक्षा जवळ आलेली आहे व रात्री विजेचा नियमित पुरवठा होत नसल्याने विद्यार्थ्यांना देखील अभ्यास करताना करताना अडचणी येत आहेत. त्याच बरोबर या भागात बिबट्याचा वावर असल्यामुळे व लोकवस्ती जास्त प्रमाणात असल्याने रात्रीचा सिंगल फेज विज व शेतीसाठी थ्री फेज पुरवठा सुरळीत ठेवण्याची आवश्यकता आहे.
या सर्व बाबींचा विचार करून यातुन मार्ग काढण्यासाठी व भविष्यात अशा अडचणी येऊ नये यासाठी जवखेडे खालसा गावामध्ये मंजूर असलेले ३३/११ केव्ही उपकेंद्राचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी आ. मोनिकाताई राजळे यांनी ना. बोर्डीकर यांच्या कडे केली आहे.