दिड लाख रु. व चांदीच्या गदेचा मानकरी ठरला पै.माऊली जमदाडे
माका येथील भव्य कुस्ती मैदानात लाखोंच्या बक्षिसांचे वितरण
नेवासा तालुक्यातील माका येथील ग्रामदैवत असलेल्या मंकावती मातेच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा कुस्तीच्या मैदानात मानाच्या मंकावती केसरी चा मानकरी पैलवान माऊली जमदडे ठरला आहे.त्यास आयोजकांकडून रोख एक लाख एकावन्न हजार रुपये व चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले.
यासह अर्जुन पुरस्कार विजेत्या व हरियाणा राज्यात तहसीलदार पदी कार्यरत असलेल्या पैलवान दिव्या कक्रान,राजस्थान येथील पीएसआय पैलवान नयना कैनवाल व बारामती येथील पैलवान भारत मदने यांना देखील चांदीची गदा व लाखो रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली आहेत.
याव्यतिरिक्त झालेल्या इतर सर्वच निकाली कुस्त्यांच्या विजयी मल्लांना आयोजकांकडून रोख स्वरूपात बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात अशा स्वरूपाचे भव्य दिव्य मैदानाचे आयोजन हे पहिल्यांदा करण्यात येऊन विजयी पैलवानांना सुमारे तेरा लाखांची रोख बक्षिसे आयोजक व ग्रामस्थांच्या सहकार्याने देण्यात आले असून यापुढे दरवर्षी अशाच स्वरूपाचे आयोजन केले जाणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच अनिल घुले यांनी यावेळी दिली.
यावेळी कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्र्वर धायगुडे यांनी आपल्या उत्कृष्ठ निवेदनाने स्पर्धेत रंगत आणली तर पंच म्हणून संभाजी निकाळजे,शुभम जाधव, वसंत फुलमाळी व किरण मोरे यांनी काम पाहिले.स्पर्धा पार पाडण्यासाठी अनिल घुले मित्र मंडळ,यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.